भगवान परशुराम |
परमात्म्याच्या दश-अवतारांपैकी परशुराम हा परमात्म्याचा सहावा अवतार मानला जातो. जमदग्नी आणि रेणुका यांच्या पोटी परशुरामाचा जन्म झाला. तुलसीपत्र अग्रलेखमालिकेमध्ये आम्ही वाचतो की माता शिवगंगागौरीच्या रेणुका या सातव्या अवतारास आदिमातेने ‘मातेश्वरी/मात्रेश्वरी’ हे नामाभिधान दिले आहे, तर जमदग्निंचे नाम ‘तपोभैरव’ हे आहे. पिता जमदग्निंकडून म्हणजेच किरातरुद्राकडून महाविष्णु परशुराम-रूपात विद्या ग्रहण करतो आणि रेणुकामातेकडून त्याला ‘आदितिविद्या’ प्राप्त होते.
रेणुकाच परशुरामाला श्रीगुरु दत्तात्रेयांच्या चरणांवर घालते. ईश्वरी नात्याने महाविष्णुचा सर्वांत मोठा भाऊ असणारे आणि सद्गुरु असणारे श्रीगुरु दत्तात्रेय महाविष्णुच्या परशुराम या अवतारात प्रत्यक्ष मानवी सद्गुरु होतात.
विश्वातील गुरुशिष्याची सर्वोच्च जोडी या अवतारातच आमच्यासमोर येते आणि यांना जोडणारी आहे माता रेणुका. ‘मातृवात्सल्यविंदानम्’ प्रकटले आहे ते श्रीगुरु दत्तात्रेय आणि परशुराम यांच्या संवादातूनच!
‘मातृवात्सल्यविंदानम्’मध्ये अकराव्या अध्यायात स्वत: श्रीगुरु दत्तात्रेयांच्या मुखातून परशुरामाचा पुरुषार्थ प्रकटला आहे.
भगवान परशुराम |
श्रीगुरु दत्तात्रेय म्हणतात: ‘‘हे परशुराम! तू स्वतःच ह्या विश्वातील सर्वश्रेष्ठ योद्धा आहेस. तू एकट्याने हजारोंच्या संख्येने असणार्या शस्त्रसज्ज सैन्यदलांचे, सेनापतींचे व मदांध आसुरी वृत्तीच्या राजांचे कंदन केलेले आहेस. तुला स्वतःसाठी कुठल्याही राजसत्तेची वा धनाची अपेक्षा नव्हती. तू केवळ सत्तेने मुजोर झालेल्या उन्मत्त राजांना कायमचा धडा शिकविलास. मात्र हे सर्व युद्धकार्य करतेवेळी राजस्त्रिया, त्यांची अपत्ये व धर्मपालनात तत्पर असणारे राजे व राजवंशीय ह्यांना तू सदैव अभय दिलेस.
श्रीगुरु दत्तात्रेय परशुरामाला, रेणुकेने देहत्याग केल्यावर परशुरामाच्या मातेस भेटण्याच्या उत्कट इच्छेनुसार रेणुकेची पुन्हा भेट घडवतात. मातृप्रेमी सद्गुरुने मातृप्रेमी शिष्याची त्याच्या मातेशी तिने देहत्याग केल्यानंतर काही वर्षांनी अशा प्रकारे भेट घडवणे ही अलौकिक, प्रेमाचे शिखर असणारी घटना!
स्वतः परशुरामाने रेणुकेची मूर्ती मातृप्रेमाने घडवली. ‘रेणुका’ हीच माता शिवगंगागौरीची प्रथम घडवलेली मूर्ती, तीही प्रत्यक्ष महाविष्णुच्या हातून, तिच्या पुत्राच्या हातून. (‘मातृवात्सल्यविन्दानम्’मध्ये आदिमाता चण्डिका गायत्रीची पंचमुखी आकृति परशुरामाने श्रीगुरु दत्तात्रेयांच्या आज्ञेने, त्यांच्या उपस्थितीत रेखांकित केल्याची कथा आम्ही वाचतोच.)
असा हा एकमेव अद्वितीय व्यक्तिमत्त्व असणारा परशुराम मातृभक्ती, पितृभक्ती आणि सद्गुरुभक्तीचा सर्वोच्च आदर्श आणि परमत्रिवेणी संगम मानला जातो.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा